पेज

१० जुलै, २०२१

प्रयत्न

 "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, तेलही गळे" या उक्तीनुसार आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी, ध्येय शक्य वाटतात जर त्याला प्रयत्नांची जोड असेल.

               माणसाचा जन्म होतो तेव्हापासून त्याच्या मृत्यूपर्यंत एका गोष्टीचे सातत्य अखंड टिकलेले ते म्हणजे "प्रयत्न"! अगदी आईच्या उदरातून बाहेर पडण्यासाठी, पहिले पाऊल टाकण्यासाठी,  आयुष्य सुंदर करण्यासाठी आणि वृद्धापकाळात जगण्यासाठी माणूस प्रयत्नांची शर्थ करतो.

               प्रयत्न म्हणजे काय, फार अवघड नाही. भूक लागल्यावर ताट वाढून घेणे, आरामदायी जीवनासाठी पैसा कमवणे, अडचण आल्यावर त्यातून बाहेर पडणे, श्वास घेण्यासाठी नाकाने हवा घेणे... हे सगळे प्रयत्नच तर आहेत! यावरून प्रयत्नांची व्याख्या करायची झाली, तर आपल्याला असे म्हणता येईल की, "ज्या गोष्टीची/वस्तूची आपल्याला गरज आहे ती गोष्ट/ वस्तू मिळवण्यासाठी आपण केलेली हर एक कृती म्हणजे प्रयत्न." पण प्रयत्न केल्यावरही तीच गोष्ट /वस्तू आपल्याला मिळेल, याची काही शंभर टक्के शाश्वती नाही हा!

               कारण, "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, तेलही गळे!" अस म्हणलं आहे म्हणून आपण तेल काढायला गेलो तर ते शक्य नाही..! वाळू ती... बारीक केल्यास भुकटीच होईल. तसेच "प्रयत्नांती परमेश्वर" म्हणून वर्षानुवर्ष देवनामाचा जप केल्यास आपण कल्पिलेल्या रूपात परमेश्वर उभा ढाकला असे होणार नाही!

               मग मतितार्थ काय? मतितार्थ हा... प्रयत्नांती आपल्याला कदाचित इच्छित गोष्ट मिळणार नाही, मात्र आपण केलेल्या प्रयत्नांची योग्य किंमत आणि फळ मिळाल्याशिवाय ही राहणार नाही. प्रयत्नांती परमेश्वर जरी नाही भेटला, तरी त्याला मिळवण्यासाठी एकाग्र झाल्याने स्वतःमधील सदगुण व इतरांतील देवपण पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच मिळेल.

                पण प्रयत्न केल्यावर ही काहींना अपयश काहींना यशप्राप्ती होते, यामागे काय कारण असू शकते. याचा विचार करता मला असे वाटते- जी गोष्ट / वस्तू आपण प्राप्त करू पाहतो, त्या बद्दल जर मनात लालसा, स्वार्थ, माज, गर्व, खोटेपणा इत्यादी अवगुणांची चाहूल असेल, तर नकळत आपले लक्ष्य प्रयत्नांवरून ती गोष्ट आपल्याला जे साध्य करून देणार आहे, तिकडे जाते. आणि मग प्रयत्न करूनही अपयश मिळाले असे आपण समजतो.

               उदाहरण..., मला अधिकारी व्हायचय, तर मला वाचन करणे, अभ्यास करणे गरजेचे आहे. अधिकारी झाल्यावर घर, गाडी, पैसा, समाजात उच्च स्थान मिळते हे देखिल मला माहिती आहे. पण जर अभ्यास करताना माझ्या डोक्यात घर, गाडी, समाजातील स्थान या गोष्टी येत असतील, तर समजावे की आपल्या अधिकारी होण्याच्या ध्येयाला अवगुणांची चाहूल चिकटली आहे.

                अर्थात, आपण यावर ही प्रयत्नांनीच मात करू शकतो. शक्य तितक्या निःस्वार्थी भावनेने आपण जेव्हा ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, तेव्हा यशप्राप्ती नक्कीच होते.




इस्राईल- Palestine

      हिटलरने ज्यू धर्मीयांचा कसा छळ केला, घृणास्पद वागणूक दिली  हे आपण जाणतो. मात्र ज्यूंविषयी हे अत्याचार वर्षानुवर्षांपासून  चालत आलेत. म...

Most viewed