पेज

१० जुलै, २०२१

प्रयत्न

 "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, तेलही गळे" या उक्तीनुसार आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी, ध्येय शक्य वाटतात जर त्याला प्रयत्नांची जोड असेल.

               माणसाचा जन्म होतो तेव्हापासून त्याच्या मृत्यूपर्यंत एका गोष्टीचे सातत्य अखंड टिकलेले ते म्हणजे "प्रयत्न"! अगदी आईच्या उदरातून बाहेर पडण्यासाठी, पहिले पाऊल टाकण्यासाठी,  आयुष्य सुंदर करण्यासाठी आणि वृद्धापकाळात जगण्यासाठी माणूस प्रयत्नांची शर्थ करतो.

               प्रयत्न म्हणजे काय, फार अवघड नाही. भूक लागल्यावर ताट वाढून घेणे, आरामदायी जीवनासाठी पैसा कमवणे, अडचण आल्यावर त्यातून बाहेर पडणे, श्वास घेण्यासाठी नाकाने हवा घेणे... हे सगळे प्रयत्नच तर आहेत! यावरून प्रयत्नांची व्याख्या करायची झाली, तर आपल्याला असे म्हणता येईल की, "ज्या गोष्टीची/वस्तूची आपल्याला गरज आहे ती गोष्ट/ वस्तू मिळवण्यासाठी आपण केलेली हर एक कृती म्हणजे प्रयत्न." पण प्रयत्न केल्यावरही तीच गोष्ट /वस्तू आपल्याला मिळेल, याची काही शंभर टक्के शाश्वती नाही हा!

               कारण, "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, तेलही गळे!" अस म्हणलं आहे म्हणून आपण तेल काढायला गेलो तर ते शक्य नाही..! वाळू ती... बारीक केल्यास भुकटीच होईल. तसेच "प्रयत्नांती परमेश्वर" म्हणून वर्षानुवर्ष देवनामाचा जप केल्यास आपण कल्पिलेल्या रूपात परमेश्वर उभा ढाकला असे होणार नाही!

               मग मतितार्थ काय? मतितार्थ हा... प्रयत्नांती आपल्याला कदाचित इच्छित गोष्ट मिळणार नाही, मात्र आपण केलेल्या प्रयत्नांची योग्य किंमत आणि फळ मिळाल्याशिवाय ही राहणार नाही. प्रयत्नांती परमेश्वर जरी नाही भेटला, तरी त्याला मिळवण्यासाठी एकाग्र झाल्याने स्वतःमधील सदगुण व इतरांतील देवपण पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच मिळेल.

                पण प्रयत्न केल्यावर ही काहींना अपयश काहींना यशप्राप्ती होते, यामागे काय कारण असू शकते. याचा विचार करता मला असे वाटते- जी गोष्ट / वस्तू आपण प्राप्त करू पाहतो, त्या बद्दल जर मनात लालसा, स्वार्थ, माज, गर्व, खोटेपणा इत्यादी अवगुणांची चाहूल असेल, तर नकळत आपले लक्ष्य प्रयत्नांवरून ती गोष्ट आपल्याला जे साध्य करून देणार आहे, तिकडे जाते. आणि मग प्रयत्न करूनही अपयश मिळाले असे आपण समजतो.

               उदाहरण..., मला अधिकारी व्हायचय, तर मला वाचन करणे, अभ्यास करणे गरजेचे आहे. अधिकारी झाल्यावर घर, गाडी, पैसा, समाजात उच्च स्थान मिळते हे देखिल मला माहिती आहे. पण जर अभ्यास करताना माझ्या डोक्यात घर, गाडी, समाजातील स्थान या गोष्टी येत असतील, तर समजावे की आपल्या अधिकारी होण्याच्या ध्येयाला अवगुणांची चाहूल चिकटली आहे.

                अर्थात, आपण यावर ही प्रयत्नांनीच मात करू शकतो. शक्य तितक्या निःस्वार्थी भावनेने आपण जेव्हा ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, तेव्हा यशप्राप्ती नक्कीच होते.




१७ जून, २०२१

LGBTQ Community

                शिर्षकतील ही अक्षरं बरेच जण पहिल्यांदा पाहत असतील, वाचत असतील. गोंधळ उडाला असेल ना... काय हे, कसं वाचायच - एल.जी. बी. टी. क्यू कम्यूनिटी सरळ सरळ आहे अस वाचा म्हणा. तर काय हे LGBTOQ= लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर... तरीही समजन्याइतक सोप्प नाही वाटत का? किंवा तुम्हाला हे शब्द माहिती आहेत पण नक्की अर्थ काय याचा गोंधळ उडाला असेल, असू दया सहाजिक आहे.

          "जगात चांगल्या गोष्टींचा गवगवा करावा आणि वाईट गोष्टी दडपून टाकाव्या" असा एक अलिखित नियम बहुधा कोणी बनवला असावा... अशाच कोणीतर महाभागांनी आपल्या बुद्धीनुसार चांगले काय, वाईट काय हे ठरवून टाकलं... आपण ते ओढत इथेपर्यंत आणलं. देव चांगला म्हणून देवाच्या अक्षरश: 33 कोटी प्रकारांच ओसंडून वर्णन आपल्या संस्कृती रक्षाकांनी केलं. मात्र माणूस विविध प्रकारांचा, वेगळ्या आकाराचा, वेगवेगळ्या निवडीचा, असू शकतो यावर कधी विचार केला? प्रत्येक देवाला नाही का वेगळा नैवेदय लागतो, वेगवेगळी फूलं आवडतात.... माणूसही स्वतः च्या निवडीविषयी स्वतंत्र आहे, त्याला तसा अधिकार आहे. काय खायचं, कोणते कपडे घालायचे, कसे घालायचे इथपासून कोणावर प्रेम करायचं, कोणाशी लग्न करायचं, इथपर्यंत सगळ्या निवडी स्वतः करण्याचा  माणसाचा वयक्तिक हक्क आणि स्वातंत्र्य आहे.

              स्त्री आणि पुरुष या दोन माणसाच्या प्रकारांत जी व्यक्ती बसते तीच माणूस. स्त्री-पुरुष यांनी एकमेकांवर प्रेम करायचं आणि एकमेकांशीच लग्न करायचं. या चौकटी बाहेर जाणाऱ्याला ना समाजात स्थान मिळतं, ना त्याची माणूस म्हणून गणना होते. स्वतःला स्त्री/पुरुष मानणाऱ्या व्यक्तींना जितका प्रतिष्ठा व सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. बेशक LGBTQ Community मधील प्रत्येकालाही तितकाच हक्क आहे. आपण माणूस म्हणून दुसऱ्या माणसांच्या निवडीवर, स्वातंत्र्यावर, हक्कावर अतिक्रमण करणे अन्यायकारक आहे. याउलट प्रत्येकाला माणूस म्हणून त्याच्या स्वातत्र्यासह जगता येईल अशी परिस्थिती, वातावरण निर्माण करणं आपलं..., माणूसकीचं कर्तव्य आहे. 
              म्हणून LGBTQ community बद्दल माहिती असणे जागरुकता असणे ही गरज आहे, नाही का ?
              तर काय असते LGBTQ community? आपल्याला स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी व्यक्ती फार तर माहित असतील. अगदी त्याचप्रमाणे Lesbien, gay, Bisexual, Transegender, Queer  हे नविन शब्द, नविन प्रकार यात Add झाले आहेत अस म्हणा हव तर.

 L= लेस्बियन किंवा समलिंगी स्त्रिया ~ सामान्य मुलींसारख्या मुली, सोप्या भाषेत सांगायच झालं, तर ज्या मुलींना मुली आवडतात, अशा. आता यात दोघींपैकी एक पुरुषा सारखी राहत असेल, वावरत असेल असं काही नसतं.

G= गे किंवा समलिंगी पुरुष ~ जेव्हा पुरुष पुरुषाकडे आकर्षित होतो, त्यांना म्हणतात किंवा एकंदरच "LGBTQ" ला देखिल गे असं संबोधले जाते.

B= बायसेक्शुअल किंवा उभयलिंगी ~ एखादया व्यक्तिला स्त्री व पुरुष दोघांबद्दल आकर्षण वाटते. त्यांना बायसेक्शुअल म्हणतात.

T= ट्रान्सजेंडर किंवा तृतीयपंथी ~ जन्मतः मुलगा किंवा मुलगी असतात. मात्र मोठे झाल्यावर त्यांच्या लक्षात येते की आपले मन आणि शरीर दोन्ही एकमेकांविरुद्ध आहेत. शरीराने मुलगा असणाऱ्या व्यक्तीस मुलींसारखं राहावं, वागावं, बोलावसं वाटतं. तर मुलीचे शरीर असणाऱ्या व्यक्तीला पुरुषांप्रमाणे राहावं, वागावसं वाटतं, यांना म्हणतात तृतीयपंथी.
                 आता जी पुरुषाचा देह असणारी व स्त्रीचे मन असणारी व्यक्ती जेव्हा साडी, ड्रेस, स्त्रियांचे कपडे घालते किंवा याउलट मन पुरुषासारखं व देह स्त्रीचा जेव्हा पुरुषांसारखे कपडे घालतात, त्यांना, ट्रान्सजेंडर क्रॉस ड्रेसर म्हणतात.
                तर काहीजण मन व शरीर यांचा मेळ घालण्यासाठी Harmonal  Replacement Therapy किंवा sex Reassignment  surgeries द्वारे बदल करून घेतात पण यांचे sexual Preference ही  Lesbian, bisexual, gay किंवा straight काहीही असू शकतात.

I= Inter-sex किंवा आंतरलिंगी ~  जन्मा वेळी Genital (जननेंद्रिये) वरून एखादी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे सांगणे अवघड असते, तेव्हा डॉक्टर योग्य वाटणाऱ्या  Sex चं ते मूल असल्याचे जाहीर करतात. त्यामुळे Inter sex. व्यक्ती देखिल मोठे होऊन LGBTQ यांपैकी कोणीही बनू शकतात.

Q = Queer- ज्या व्यक्तींना अजून कळलेलच नसत, की आपण नक्की LGBT यांपैकी काय आहोत, आपण कोणाकडे आकृषित होतोय, त्यांना Queer किंवा questioning म्हणतात.

LGBTQ Flag


               ही झाली केवळ LGBTQ बाबतची तोंडओळख किंवा Terminology. खरे प्रश्न तर पुढे आहेत, यांच्या हक्काचे, स्वातंत्र्याचे, अस्तित्वाचेच म्हणा ना. 
              येणाऱ्या blog मधून आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जर याबाबत काही प्रश्न असतील तर comments मध्ये विचारा. पुढील blog मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.

१५ जून, २०२१

पाऊस

प्रत्येक थेंबाचा शब्द घेऊन येतो ,
टप्पोऱ्या तालाच गाणं गातो तो...
आईप्रमाणे  फुलवेलींच्या पाना-पानाला  बिलगतो,
धारित्रीची  महिन्यांची धग शमवतो तो...
रडवेल्याच्या  डोळ्यातील धारा होतो ,
खुशालीच्या आनंदी सरी होतो तो...
जोडप्यातील दुवा होतो,
एकट्याचा प्रियकर होतो तो...
कवीची कविता होतो,
साहित्याचा शृंगार होतो तो....
प्रत्येकाचा दोस्त होतो,
ज्याला त्याला आपलाच वाटतो तो...!

       


पाऊस वेड आहे, आनंदी असणाऱ्याला नाचायला लावणारं गाणं वाटतो हा पाऊस...., दुःखी असणाऱ्याला त्याच्या अश्रूंचा बांध वाटतो पाऊस...., प्रियकराला प्रिययसीची मिठी वाटतो पाऊस....., लेखकाला त्याच्या लेखणीची शाई वाटतो हा पाऊस....,वेड्याला त्याचं वेडचं वाटतो हा पाऊस....!!!!


कित्येक कवी, दिग्गज लेखक आपल्या लेखणीतून याच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. पण शब्दात व्यक्त  करण्याच्या पलीकडचा आहे तो... वेड लावतो हा निसर्ग, त्याची सुंदर रूपं... रात्रीचं निखळ चांदणं..., चंद्राच्या कला..., त्याच्या सौंदर्यापूढे  दिवसभराचा गोंधळ जणू अंधारात विरून जातो. दुसऱ्या दिवसाची सोनेरी पहाट... आणि हा पाऊस...,







१३ जून, २०२१

खेकडे

                 इथे पाण्यातला प्राणी खेकडा याविषयी नाही माणसातील प्रवृत्ती - 'खेकडा' याविषयी लिहिलं जातयं. अशा प्रवृत्तीच्या लोकांविषयी  राग बाळगावा की त्यांच्या गरिब मनाची कीव करावी तेच कळत नाही. 

               कामाच्या ठिकाणी, मित्र-मैत्रिणींमध्ये, शेजारी, घरात, नातलगात, समाजात अक्षरश: सगळीकडे हे लोक तुम्हाला दिसतील. स्वतःच्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी, जीवन समाधानाने जगता यावं, आपलं ध्येय शोधावं, त्याचा मार्ग निवडावा, आपल्याकडून आपल्या माणसांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्या, निदान हे सगळं करण्याचा प्रयत्न तरी करावा... या वेडापायी  माणूस धडपडत असतो, प्रवास करत  असतो. मात्र दुसऱ्याची प्रगती बघवेल ते खेकडे कसले..., नांगी उंचावून, पाय ओढणे, अडथळे घालणे हाच तर गुणधर्म त्यांचा! 

              स्वतः गाळात रुतून राहायचं, बाहेर पडण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही व दुसऱ्यालाही गाळातून वर येऊ दयायचे नाही. कसला कपटीपणा म्हणायचं याला!!!                              

             बरं...,आणि मग, जो स्वतःला गाळातून बाहेर काढू शकत   नाही, स्वतःचीच मदत करू शकत नाही, त्यांच्यावर राग तरी कसा धरायचा??? निष्क्रीय, कपटी, खुळचट, गरिब अन् अशा आजारी मनोवृत्तीची करावी तेवढी कीव कमीच नाही का ??? 

               त्यामुळे खेकडयांकडे लक्ष न देणंच चांगल. कारण "निंदकाचे घर असावे शेजारी" या नुसार जर आपण खेकडा निंदक म्हणून पाळला.... तर तो त्याच्या गुणधर्माप्रमाणे आपल्याला गाळात दाबूनच मारणार!!! निंदक हा आपल्यातील दोष, चुका सांगणारा असावा ज्यात सुधारणा करून आपण प्रगतीच करु. मात्र खेकड्या सारखा निंदक.... आपली प्रगती सोडा, आहे ती गती, स्थिती ढासळवायला असतो, हे वेळीच कळलं पाहिजे.

                आपली अडवणूक करून खेकडयाचा हेतू साध्य होतो, त्यामुळे त्याला ओलांडून जाता आलंच पाहिजे.

                आपल्या घरातून, शाळेतून "एखादयाच कौतुक होणं, चांगल होण, आपल्याला बघवत नसेल, तर त्याविषयी निदान वाईट चिंतू नये" असा संस्कार नक्कीच झालेला असतो. त्यामुळे एखादयाची प्रगती इतकीच खुपत असेल डोळ्यात, तर आपण आपला मार्ग बदलावा... किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रगती करावी. मात्र खेकड्यसारखं पाय ओढून माणुसकीची अब्रू वेशीवर आणू नये.

११ जून, २०२१

माणूस हरवतोय...

             उघड्या डोळ्यांनी सगळं बघत जगायच म्हणलं, तर एकवेळ अंधत्वाला बिलगावस वाटेल इतकी अराजकता आहे सगळीकडे. गेल्या एक दिड वर्षात माणूस गिळायला आलेला हा Covid काय फक्त आजार नाही. माणसाला माणूसकी विसरायला लावणारा, हताशतेनं सगळं फक्त बघत बसायला लावणारा राक्षस आहे. 

            सुरुवात झाली ज्याला त्याला आहे तिथेच त्याच अवस्थेत, बिकट परिस्थितीत डांबून ठेवण्यापासून. Lockdown, isolation, quarantine च्या नावाखाली काय माणूसकीच विलगीकरण, असामाजिकीकरणच तर होतं. आपला देश तर संस्कृती अन् सामाजिनीकरणाचा रंगमंचचं, बारसं असो, लग्न असो, वाढदिवस असो, सण, आनंदी, दु:खी घटना, अगदी कोणताही क्षुल्लक प्रसंग ही असो, काय निमित्त लागायच हो आपल्याला एकत्र यायला? 

          आता आपला जीव इतका महत्वाचा झालाय, इतका धोक्यात आलाय की आपण इतर कशात सहभागी होण्याचा विचारही नाही करत. एकटे राहण्याला बाहेरच्या लोकांशी संपर्क न ठेवण्यालाच आपण प्राधान्य देतो. काळाची मागणीच तशी आहे. आपला माणूस जरी आजारी असला, शेवटचे श्वास मोजत असला, आपल्याला ना त्यांच्या जवळ जाण्याची परवानगी आहे, ना हातात हात घेऊन धीर देण्याची!!! बिकट आहे सगळं. 

           फारशी ओळख नसणाऱ्या, पुरेशी माहिती व आवश्यक ज्ञान ही उपलब्ध नसणाऱ्या अशा आजारावर डॉक्टर उपचार करतात, आणि अशा सगळ्या  बेभरवशाच्या डॉक्टर, दवाखाने अन् उपचारपदधतीकडे आपला श्वासही न घेता येणारा माणूस हवाली करणे म्हणजे.... या अंधारात एखादयाला उंच कड्याकाठी सोडून दिल्यासारखचं भितीदायक नाही का? कधी पाऊल चुकेल म्हणून पाहणाऱ्याला धाकधूक... अन् चालणाऱ्याच्या मनाचा ठाव तर आपण घेऊ ही शकणार नाही. 

            फक्त हताश होऊन सगळं बघत बसण्यापलीकडे आपण करूच काय शकतो. मृत्यू माणसाला चुकला नाही, चुकणार ही नाही, पण हा आजार ज्या प्रकारे मागे राहिलेल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडत.... कुठे कुठे तर अख्खी कुटुंब नष्ट करत.... माणूस गिळंकृत करत चाललाय ना....हृदयद्रावक!

           माणूस तर हरवतोच आहे. पण त्यासोबत माणूसकी अन् भावना विनाश मनाला खिन्न करतो. जीव वाचवण्यासाठी दवाखान्यातील जीवघेणी धडपड...., रेमडीसीविर, इन्फेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर जणू मृत्यूशिडीच...., स्वतःच्या बापाच्या मृतदेहाला स्वतःच खांदा देणारी लहान मुलं...., सायकल, गाडीवरून मृतदेह आपल्या पाठीशी बांधून वाहून नेणारी म्हातारी माणसं....., स्मशानभुमीत एकाच वेळी जळणारी 10-10, 20-20 प्रेतं....

          वाचताना जितकं वाईट, विदर्ण अन् खिन्न वाटतयं, त्याहून खूप वाईट प्रत्यक्ष घडतयं.....!!!!

९ जून, २०२१

स्पर्श

            तशी काही फार रात्र नव्हती झाली मात्र गावागाड्याच्या रीतीने वेळ बरीच झाली होती. जेवणपाणी आटोपून मंडळी एकेक करत आपापला बिछाना घेऊन आपापल्या जागी कोणी देवळात, कोणी अंगणात, कोणी ओसरीत पडली होती, झोपेच्या तंद्रीत बाया रात्रीची जेवणानंतर ची आवराआवर करीत होत्या. बांगड्या भांड्यांचा आवाज येत होता अधूनमधून. 

            ती नेहमीप्रमाणे शांत, एकटी पटांगणात चिमुकला देह घेऊन चांदण्यांची सैर करीत होती. तीच रोजचचं होत हे. घरातल्या मोठ्या मंडळींकडून गोष्ट ऐकत ही तिची चांदणवारी नवीन नव्हती. पण मग आज वेगळं काय होतं???

            आज ती एकटीच होती, ना गोष्ट होती, ना रोजचा तो चांदणवारीतील आनंद आज तिला मिळत होता... अस्वस्थ होती, घाबरीघुबरी झाली होती थोडी. आकाशाकडे तोंड, बोटं घट्ट एकमेकांत गुंतवून हात पोटावर ठेवून झोपण्याचा प्रयत्न चालू होता.

           तेवढ्यात एक चाहूल तिला चलबिचल करून टाकते. चाहूल ओळखीची, चेहरा नेहमीचा, मात्र तो स्पर्श, त्यातील विकृती, घृणता... त्याची ना तिला ओळख होती, ना जाणीव. 

              जे काही झालं ते चूक होतं, बरोबर होतं, काय होतं आणि मुळात तिच्यासोबत का झालं हे ना तिला कळत होतं, ना ती काळण्याइतकं तिचं वय होतं. कोणाला सांगायचं म्हणलं तर ती काय सांगणार होती, ती घटना वर्णन करण्याइतका शब्दसाठाही नाही अजून तिचा. मग काय, गप्प बसली, खेळण्या बागडण्याच्या नादात मोठं होत असताना ती घटना विसरली सुद्धा. 

              पण जेव्हा तिला वाईट नजर काय असते, वाईट स्पर्श काय असतो, बलात्कार काय असतो, child sexual harassment काय असते हे सगळं समजत गेलं, तिच्या मनावर बालपणी झालेली जखम पुन्हा भळभळती व्हायला क्षणही लागला नाही.

             कारण घाव शरीराला झाले असतील तर ते दिसून येतात व कालांतराने नाहीसे ही होतात, पण मनाची जखम ना दिसून येते, ना पुसता येते. आणि इथे तर तो स्पर्श... अन्, त्या मागची मनो-विकृतता तिला आयुष्यभर सतावत राहील इतकी बिभत्स तर नक्कीच होती...!


७ जून, २०२१

कसली बरोबरी करतेस गं...!

कसली बरोबरी करतेस गं,

शक्य आहे का तुझी माझी बरोबरी.


तू किती श्रीमंत मी किती गरीब

जाणतेस का केवढी मोठीय ही दरी.


तुझं सगळं कसं नीटनेटकं,

आणि मी ही अशी फाटकी.


तुझ्याकडे कसा गं मऊशार पलंग

जमीन अंथरूण अन् गारठाच माझी रजई.


तुला खायला किती गं नाना मिष्टान्नं,

फक्त पाणी पिऊन झोपण्यात पण मला नाही बाई कचराई.


तुझ्याकडे शोभेसाठी लाईट

मला नाही भरणं होत बिलं विजेची.


तुला आवडतो ना गं पाऊस

मला त्यात छप्पर बुडण्याचीच भीती.


तुझं इंग्रजी शिक्षण 

अन् मी मात्र अडाणी.


तुला माझी लाज 

पण मला आवडेल गं तुझी मैत्री.


तू  रुबाबदार, आलिशान

खिन्नता अन्  दारिद्र्य माझ्या दारी.


म्हणून बाई तू श्रीमंत अन्

माझी मी गरीबच बारी.

५ जून, २०२१

Hypocrisy कि भी हद है भाई !

             Instagram, whatsapp, facebook, tv news कोणत्याही समाज माध्यमावर पहा, जिकडे तिकडे ज्याने त्याने अमुक लोकांना जेवण दिले, अमुक हॉस्पिटलमध्ये डब्बे पोहोचवले, रस्त्यावरच्या गरिबांना मास्क वाटले, खाण्यापिण्याचे पदार्थ दिले अशा आशयाचे अनेक फोटो, व्हिडीओ, feeling blessed चे captions आणि प्रसिद्धी साठी लागणाऱ्या गोष्टींसह पोस्ट केलेल्या असतात. 

          आता यात वावग काहीच नाही. चूक किंवा बरोबर आपल्याला ठरवण्याचा अधिकारही नाही. ज्याला जे जसं योग्य वाटतं तस ती व्यक्ती वागत असते. अर्थात एखाद्याचा हेतू प्रसिद्धी मिळवणं असला तरी त्यात देखील तो नकळत गरजूंची मदत ही करतच असतो... 

          पण यावरून खूप मुद्दा रंगतो की दान/ मदत/समाजसेवा/ उपकार/ भीक (अगदी ज्याच्या दृष्टीने यापैकी जे काही असेल ते) करताना त्याचा गाजावाजा करावा की नको???

            दानधर्म/ समाजसेवा करताना गुप्तता ठेवावी. इतकी की उजव्या हाताने केलेले दान/मदत डाव्या हाताला देखील करू नये. आणि याची पुष्टी आपल्या भारतीय संस्कृतीत स्पष्टपणे केली आहे.

            पण मग ज्यांनी फोटो काढून, पोस्ट टाकून मदत/दान केले त्यांच काय??? कारण मदत तर त्यांनी ही केलीच आहे ना. 

           हे जर इतकं स्पष्ट असेल तर मग गाजावाजा करून दानधर्म व so called समाजसेवेचे व्रत हाती घेतलेल्या लोकांविरुद्ध इतकी आगपाखड का होते???

             तर...., इथे मुद्दा येतो हेतूचा! तुम्हाला जर समाजसेवा करायची आहे तर तिला प्रसिद्धीचा अट्टहास का धरावा? आणि तुमचा हेतू प्रसिद्धी मिळवण्याचाअसेल तर त्याला उगाच समाजसेवा/ दान/ मदत असली ठिगळं कशाला जोडत बसायची???

           याला ही गाजावाजा करून मदत करणाऱ्यांच्या बाजूने प्रत्युत्तर असत की, आमचे फोटो, व्हिडीओ, पोस्ट पाहून इतर लोक प्रेरित होतील आणि ते देखील मदतीसाठी पुढाकार घेतील....!!!

            आता मात्र या हेतू लपवण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांची कीव येते... 

       कारण मला सांगा भारताचा कुठला कोपरा असा असेल हो, जिथे भिकारी रस्त्यावर भीक मागत नसतील, वयस्कर मंडळी पोराबाळांनी सोडून दिलय म्हणून गावभर हिंडत नसतील, वेडसर बायका लाजेची  जीर्ण लक्तरं अंगावर घेऊन फिरत नसतील?????  देशात वळणावळणावर गरिबी अन् विदीर्णतेची चित्र जिवंत असताना त्याने प्रेरित न होणारे लोक, यांच्या पोस्ट, अन् फोटो ने प्रेरित होणारयत का????

       Hypocrisy कि भी हद है भाई!


३ जून, २०२१

Its ok to have bad days....!

          आदल्या दिवसावर अंगावरच पांघरूण टाकायला अन् आजचा दिवस सूर्याच्या प्रकाशाने दैदिप्यमान करायला रोज येते ती..."सकाळ!" 

         कधी फार उत्साही, कधी अगदीच कंटाळवाणी उठल्या- उठल्याच बोर व्हायला लागतं ना... ती कंटाळवाणी सकाळ. तिच्याबरोबर येणारा कंटाळवाणा दिवस!!!

         प्रत्येक दिवस नसतो ना सारखा... कितीही ठरवलं तरी प्रयत्न केला तरी ठरवलेलं काही होतच नाही आपल्याकडून. आणि असा फक्त 1 दिवस असत नाही. कधी कधी लगेच mood fresh होतो; पण कधी कधी असे बोरिंग दिवस एकामागे एक येतच राहतात. आणि आपण सगळे आता अशा परिस्थितीत आहोत की सततच छोट्या छोट्या गोष्टी देखील त्रासदायक वाटतात. भयंकर असतं ना.

         मग अशावेळी पुस्तक वाच, motivational quotes वाच, गाणी ऐक, movie पहा, तुझा ज्यात interest आहे ती गोष्ट कर. असे अनेक सल्ले कानावर पडतातच... 

          पण मुळात मला यावेळी कशातच interest नाहिये, सगळं सुन्न झालय, शांत बसायचंय, पडून राहायचंय, कुणाशीच बोलायचं नाही, काहीही करायचं नाही हे आपल्या मनात चाललेलं असतं. आणि Its ok to be sad,  Its ok to be bored, Its ok to have bad days... 

        आनंद, राग, प्रेम, उत्साह आशा वेगवेगळ्या अवस्थांतून मन प्रवास करत असते... त्यात असे दिवस ही येणार जिथे सगळं थांबलं आहे असं  वाटत. पुढचं काही सुचत नाही किंवा, पुढचा काही विचार करण्याचीच इच्छा नसते.

       आपणच म्हणतो ना माणूस भावनाशील आहे, केवळ माणसालाच मन आहे, ज्यामुळे आपण मनाच्या विविध अवस्था अनुभवू शकतो. त्यामुळे... आपण मनाची ही अस्वस्थ किंवा स्तब्ध अवस्था अनुभवत असू तर त्यात गैर अस काहीच नाही ना... आणि आपण हे मान्य करणं ही प्रथम पायरी असली पाहिजे या दिवसांवर मात करण्याची!          

          मान्य करणे म्हणजे काय तर-  "असे दिवस येतात, सगळ्यांच्या आयुष्यात येतात... आणि निःशंकपणे ते दूर ही जातात" यावर अढळ विश्वास ठेवणे. याच विश्वासाला आपली प्रेरणा बनवायची....

          कारण.... आपल्या गरजा पूर्ण करायला भाग पडणारी अंतरिक शक्ती म्हणजे "प्रेरणा" असते. आणि आनंदी राहणे ही स्वभावतःच माणसाची गरज असते.

           प्रेरणा आपल्याला "जिवंतपणा" देते. जेव्हा कुठलीच गोष्ट आपल्याला प्रेरित करत नाही..., किंवा खरे तर... आपण कोणत्याही गोष्टीतून प्रेरणा घेण्यास हतबल होतो.... तेव्हा आयुष्य "शुन्यात" जाते. आणि आपण, केवळ श्वास घेतोय म्हणून "जिवंत" असतो.... पण... " जिवंतपणा" "शुन्यात"च  अडकलेला असतो. म्हणून प्रेरणा ढळू द्यायची नाही.  




१ जून, २०२१

Challenge...!

           माणूस म्हणून जन्माला येणं सोप्प असत,

           पण माणूस म्हणून जगण्यात

           खरं challenge असतं!!

मी मी करत डबक्याचा 

राजा होणं सोप्प असतं,

डबक्या बाहेरच्या जगातलं 

आस्तित्व सिद्ध करण्यात 

खरं challenge असतं!!

            सज्जनतेच्या बुरख्याखाली 

            चांगुलपनणाचा आव आणण्यापेक्षा

            खऱ्या चेहऱ्यानं जगासमोर जाण्यात

            खरं challenge असतं!!

आपल्या घरी पाळीव प्राणी असतो

त्याला लळा लावणं 1वेळ जमतं

पण माणूस बनून 

माणसावर निस्वार्थ प्रेम करण्यात 

खरं challenge असतं!!!



२८ मे, २०२१

आत्म्याशी विद्रोह....???

एकदा सर्व नाती तोडून

एकटीनेच जगायच ठरवलं... 

माझ्या सग्यासोयऱ्यांशी

मीच बंड केलं! म्हटलं दयाव सगळ सोडून...,

तितक्यात मनातल एक दार उघडलं

आतल्या दृश्यानं, जणू मनचं जिंकलं!

       एक पाऊल आपसुकच आत पडलं,

       वातावरण गजबजलेले...

       बाया-बापड्यांनी भरलेलं, 

       पुष्पहारांनी सजवलेलं,

       सुगंधाने दरवळणारं,

       चिमुकल्या स्वरांनी किलबिलणार,

       सनई-चौघडयांनी दुमदुमूणार...

       त्याच्या तालावर मध्येच डुलणार! 

       मिष्टानांच्या मधूर लाटेबर, घरभर फिरणार,

       आनंदाच्या झोक्यावरून, मनसोक्त हिंदोडणारं!!!

अगदी इन्द्रदरबारातील सूखवास्तू सोहळाच जणू....!

       बेफाम निसर्गसौंदर्यात भर टाकण्यासाठी 

       भूमातेच्या पाठीवर पाय रोवून आलेल्या

       चिमुकलीच्या जन्म स्वागताचा सोहळा...!

अचानक दुसरीकडून...,

       काळीज चिरणारा

       मनाला भेडसावणारा, 

       कानशीलांवर आदळून

       त्याच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या करणारा ,

       हा जहरी, भेसूर, बेबंध, उन्मत्त, 

       कर्कश्श आक्रोश......???

कसला होता तो.......???

माझ्या आत्म्याचा....,

       चिमुकलीच्या देहाशी झालेल्या मिलापाचा सोहळा,

अन्...

       माझ्या देहापासून काडीमोड झाल्याचा विद्रोह होता तो...!!!

Photo by-pallavi


२६ मे, २०२१

मुलगी वयात येताना...!

      एकीकडे परिवर्तनाची कास धरून वाईटाला विरोध आणि योग्य गोष्टीला सामर्थ्य पुरवत मौनांची अंतरे पार करू पाहणारी संवेदनशील लोकांची फळी आहे ,तर दुसरीकडे याच संवेदना पायदळी तुडवत पुरुषी अहंकार अन अज्ञानाचा नंगा नाच सुरु आहे.

     अशा वेळी खरी कसोटी असते ती या दोघांच्या मधल्या फळीची.एकीकडे तुमच्या ज्ञानाची, सहनशीलतेची, स्वाभिमानाची परीक्षा, तर दुसरीकडे विकृतींचं व कुबुद्धीचं मनोरंजन. तुमच्या हातात असतं तुम्ही त्या परिस्थितीत मूग गिळून, मठ्ठपणे, निर्बुद्धपणे सगळं पाहत राहायचं की माणसाचं लक्षण ओळखून, माणुसकीला जागून, अन्याय-अत्याचाराविरुद्ध स्वतःला सिद्ध करायचं!
     भले मग अशा वेळी वाटेत काटे येतील,नव्हे वाटच काटेरी असेल! तेव्हा निर्धार, विश्वास, सहनशक्तीच्या फांद्या इतक्या मोठ्या करा की काटेरी वाटाही झुकतील! सगळे जेव्हा या वाटांवरून जातील, तेव्हा काटेच बोथट होऊन जातील!!!
     म्हणून अशा काटेरी, न वापरलेल्या जाणाऱ्या, अंधाऱ्या, वाईट समजल्या जाणाऱ्या वाटा पायाखाली आल्या की, होणारच-सुरळीत, मऊ, मखमली!!!
सांगण्याचा मतितार्थ हाच की, समाजातही अशा काही गोष्टी, रूढी,( गैर) समज आहेत, ज्यावर वर्षानुवर्षे मौनाचे व्रत चालू आहे. त्यामुळेच या गोष्टींबद्दल "काटेरी वाटांप्रमाणेच" गैरसमजुती अन myth पसरले आहेत.
     परंतु आज या वाटा पूर्ववत करण्यासाठी अनेक वाटाडे सज्ज होऊन मार्गस्थ झाले आहेत. यातील एक वाट जाते, "महिलांच्या मासिक पाळी" कडे! मुळात याबद्दल पहिला मुद्दा म्हणजे किती विरोधाभास बघ ना, प्रत्येक महिन्याला या वाटेवरून जाऊनही या वाटेवर ही अविचाराची जळमटे का??
     स्त्रीच्या शरीरातील अंडपेशींचे फलन न झाल्यास ही अफलीत अंडपेशी रक्त व म्युकस सहित स्त्रावाच्या स्वरूपात गर्भाशयाबाहेर टाकली जाते. ही प्रक्रिया 3-5 दिवसांची असू शकते. आणि हि नैसर्गिक प्रक्रिया म्हणजेच मासिक पाळी.
     ज्याप्रमाणे आपले शरीर वेगवेगळ्या दैनंदिन क्रिया-प्रक्रियांना प्रतिसाद देत असते, जसे पचन, रक्ताभिसरण, श्वसन याचप्रमाणे मासिक पाळी ही केवळ एक, स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या बदलांची क्रिया आहे..!
     मात्र याकडे आपल्या अज्ञानी समाजाने एक अपवित्र गोष्ट म्हणूनच पहिले. मासिक पाळी चालू असणाऱ्या महिलेला केवळ अवहेलना, कुचेष्टा, लाजिरवाणी वागणूक आणि दुर्लक्षितपणा हेच भोगावे लागते. 4दिवसात जेव्हा तिच्या आरोग्याची काळजी घेणे, स्वच्छता राखणे गरजेचे असते, तेव्हा तिला घराच्या एखाद्या न वापरल्या जाणाऱ्य, अस्वच्छ, अंधाऱ्या, कुबट कोपऱ्यात टाकले जाते. या 4 दिवसात तिने जवळ जवळ घरच्यांशी संबंधच ठेवायचा नसतो म्हणा ना....
     आणि हेच सारं विटाळाच अनिष्ठ पाळत आपण आजवर जगत आहोत. या गोष्टीच गांभीर्य कधी आपण मानलच नाही. मासिक पाळीच्या वेळी, ती सुरु होण्यापूर्वी मुलींना त्याबद्दल माहिती करून देणे, आरोग्य व स्वच्छतेबाबत काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शनाची गरज असते... पण आपल्या समाजाच्या या उलट्या गंगेत मात्र, याबाबत गुप्तता कशी पाळावी, हे सगळं कसं अपवित्र आहे, यासंबंधी चालीरीती कित्ती कटाक्षाने पळवायला हव्यात याचीच सुमने वाहिली जातात, ही एक दुर्दैवाचीच गोष्ट....!
     पहिल्यांदा जेव्हा एखाद्या नकळत्या मुलीला पाळी येते, तेव्हा तिच्या मनात अनेक प्रश्नांची काय घालमेल होत असेल....याच्या विचारानेच मन कासावीस होते. योनीमार्गातून अचानक त्रासदायकपणे रक्तस्त्राव होणे म्हणजे आपल्याला काही महाभयंकर आजार झाला आहे का?, आपण प्रेग्नेंट तर नाही ना????  अशा प्रश्नांनी हैराण होऊन जात असेल ती.....
     अशा वेळी गरज असते त्या मुलीला तिच्या सोबत होत असलेल्या शारीरिक बदलांची जाणीव व माहिती करून देण्याची. आणि ही जबादारी असते, तिचा त्या वयातला ज्ञानाचा स्रोत असणाऱ्या शाळा, घर, नातेवाईक किंवा एकूणच अनुभवकर्त्यांची. मात्र.... आपल्याकडे या विषयावर घरातच काय, कुठेही बोलने अगदी निशीद्ध!!! उपाय म्हणून शालेय विज्ञानाच्या अभासक्रमात मासिक पाळीचा भाग समाविष्ट केला, तर शिक्षकांनी रुढींच्या कर्तव्य पालकांप्रमाणे अगदी इमानदारीने हा भाग शिकवण्यातून गाळून टाकला! केवढी मोठ्ठी ही शोकांतिका आपल्या शिक्षण व्यवस्थेची...
      महिलांना बरेच आजार हे मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता न राखल्याने किंवा त्याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने होतात. यातून पुढे जाऊन महिलांना गर्भाशय काढून टाकणे वगैरे अशा गोष्टींना सामोरे जावे लागतते. त्यामुळे स्त्रियांचे आयुष्य वाढवायचे असेल, त्यांना प्रगतीचा मोठा भागीदार बनवायचे असेल, तर त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग असणाऱ्या मासिक पाळीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
     याची सुरुवात घरातूनच झाली पाहिजे. घरातील पुरुषांनाही याबद्दल माहिती असली पाहिजे. तुमच्या घरात जेव्हा तुम्ही तुमच्या नव्याने मासिक पाळी चालू होणाऱ्या मुलीला याबद्दल माहिती देता, तेव्हा मुलाला देखील त्याबद्दल संगण्याइतपात मोकळीक,समज आता यायला हवीच. कारण, असे दिसून येते की बऱ्याच पुरुषांच्या नजरेत मासिक पाळी म्हणजे-स्त्रियांचा विषय, एक आजार, दुर्लक्ष करण्याचा विषय, न बोलणेच बरे...वगैरे वगैरे असं आहे....
     या दृष्टिकोनाला जबाबदार कुठेतरी स्त्रीयादेखील आहेत. कारण,एखादी गोष्ट तुम्ही जितकी लपवून, रहस्यमय ठेवता तेव्हा त्याबद्दल कुतूहल किंवा अनर्थ निर्माण होणारच. आणि त्यातूनच मग अशा गैरसमजांचे पेव पसरत जातात. दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांनीही दृष्टिकोन बदलून याकडे गांभीर्य, जाणीव, संवेदनशीलतेने बघणे गरजेचे आहे.
     अर्थात परिस्थिती बदलत आहे, वाट बऱ्यापैकी साफ झाली आहे मात्र अजूनही पूर्ण नाही! मुलींनीही girls problem, secrets म्हणून हया बद्दल बोलणे टाळणे टाळावे. कारण ही गुप्तता दूर झाल्याशिवाय मासिक पाळी व त्यासंबंधित आरोग्य, स्वच्छता,आजार याबद्दल मुक्त चर्चा होणारच नाही....म्हणून या सामान्य गोष्टीला जे असमान्यतेचे आवरण चढले आहे ते दूर करून, 'स्त्रीला'- पुरुष व स्त्रिया दोघांनीही 'मासिक पाळीसह' स्वीकारणे आवश्यक आहे......!

Photo curtecy-Akanksha mote


२४ मे, २०२१

इस्राईल- Palestine

      हिटलरने ज्यू धर्मीयांचा कसा छळ केला, घृणास्पद वागणूक दिली  हे आपण जाणतो. मात्र ज्यूंविषयी हे अत्याचार वर्षानुवर्षांपासून  चालत आलेत. म्हणजे हजारो वर्षात क्वचितच इतका आकस इतर कोणत्या धर्माने अनुभवला असेल. 

     19व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत आपला स्वतंत्र देश असावा अशी भावना ज्यूंमध्ये निर्माण झाली होती व काही संघटना या विचाराचा प्रसार देखील करत होत्या. या संघटना स्वतः ला "lovers of zion" म्हणवून घेत. यासारख्या कारणांमुळेच 1981 मध्ये ज्यूंचे मोठया प्रमाणात Palestin मध्ये स्थलांतर झाले. कारण, Palestine मधील जेरुसलेम हे ज्यूंसाठी सर्वात पवित्र धार्मिक स्थान आहे.

           


त्याकाळी Palestine ऑटोमन साम्राज्याचा भाग होते. जेथे मुस्लीम, ख्रिश्चन, ज्यू तिन्ही धर्मीय आनंदाने वास्तव्यास होते. जेरुसलेम हे या तिनही धर्मीयांसाठी महत्वपूर्ण शहर असल्याने यावर ताबा मिळवण्यासाठी देखील संघर्ष हा होताच.

 

        

        1 ल्या महायुद्धाच्या काळात झालेल्या 3 करारांनी या प्रदेशातील संघर्ष आणखी चिघळला गेला.
◆ब्रिटन व अरब यांच्यातील मॅकमोहन-हुसेन करार = ऑटोमन तुर्कना हारवण्यासाठी मदत केल्यास ब्रिटिशांनी अरबांना palestine देण्याचे वचन दिले.
◆ब्रिटन व ज्यू यांच्यातील Balfour decleration= ज्यूंना स्वतंत्र देश हवा होता.अरबांप्रमाणेच ब्रिटिशांनी ज्यूंनाही palestin देण्याचे वचन दिले.


◆ ब्रिटन व फ्रान्स यांच्यातील Sykes-picot agreement=  यांच्यात गुप्त करार झाला. त्यानुसार ऑटोमन 1ल्या महायुद्धात हारले तसे ऑटोमन प्रदेश ब्रिटन व फ्रान्समध्ये विभागला व पॅलेस्टीन ब्रिटनकडे आले.
        आणि अशाप्रकार 1917 ते 1948 पर्यंत Palestin ब्रिटीश नियंत्रणात  होता.

     जर्मनीत ज्यावेळी हिटलरच्या हाती राजकीय सत्ता आली, त्याने ज्यूंची हत्या चालू केली. आश्रयासाठी ज्यू विविध देशांत गेले. बरेच जण  Palestinला आश्रयासाठी गेले. सुरुवातीला ब्रिटनने आश्रय दिला. मात्र, नंतर palestin वर वर्चस्व असलेल्या ब्रिटनने ज्यू लोकांना प्रवेश नाकारला. ज्यामुळे Israel nationalist moment चालू झाली. स्वतंत्र ज्यू राष्ट्राची मागणी जोर धरू लागली आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे कळताच ब्रिटनने हात वर केले ही जबाबदारी संयुक्त राष्ट्र संघटनेकडे गेली. 

            United Nations Partition Plan 1947, नुसार संयुक्त राष्ट्र


(UN)ने या प्रदेशाचे पुढीलप्रमाणे विभाजन केले. 43% -अरबांना, 53% - ज्यू लोकांना, तर, जेरुसलेम आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली राहील असे ठरले.
        याप्रकारे 1948 ला Israel निर्माण झाले. हे अरब राष्ट्रांना मान्य नव्हते. त्यामुळे अरब राष्ट्रांनी इस्त्राईस विरुद्ध युद्ध पुकारले. 5 पेक्षा जास्त राष्ट्रांनी एका नवीन निर्माण झालेल्या देशाविरुद्ध आरंभलेले हे युद्ध, यात आश्चर्यकारकपणे इस्त्राईलचा विजय होतो. इस्त्राईल या युद्धानंतर Pertition Plan नुसार Palestine च्या असणाऱ्या भागांवर मिळवतो. यावेळी West bank प्रदेश जॉर्डनकडे आणि Gaza Strip प्रदेश इजिप्तकडे होता. आणि मूळ पलेस्टिनी लोक मात्र स्वतःच्या देशा अभावी इतर अरब राष्ट्रांमदे विखुरले गेले होते.
     Israel ला विरोध करण्यासाठी पलेस्टिनी लोकांनी संघटना उभारली - Palestine Liberation Organization (PLO)(फतेह) सुरुवातीला UN ने ही दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर केले. मात्र 1988 ला पलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना म्हणून PLO ला UN चा पाठिंबा मिळाला.
     दुसऱ्या महायुद्धात इस्लाईलने पूर्ण West वर ताबा मिळवला होता. पुढे ज्यू लोक मोठ्या प्रमाणात West bank प्रदेशात वास्तव्यास येऊ लागले. तिथे ज्यूं च्या कायस्वरूपी वसाहती निर्माण झाल्या. ज्या आजतागायत अस्तित्वात आहेत. याला इस्राईल सरकारचा पाठिंबा आहे. मात्र आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या वसाहती बेकायदेशीर आहेत.
     1948मध्ये इस्त्राईल निर्माण झाला. तेव्हापासून किंबहुना त्याही पूर्वीपासून इस्त्राईल पॅलेस्टिन संघर्ष चालू आहे. दोन्ही देशांमध्ये जेरुसलेम राजधानीचा प्रश्न, निर्वासितांचा प्रश्न, सीमा प्रश्न असे संघर्षाचे अनेक मुद्दे आहेत. यावर शांततेच्या मार्गाने, लष्करी सामर्थ्यादवारे तोडगा काढण्याचे प्रयत्न चालू असतात. त्यातीलच एक- OSLO Accords, 1993. Israel-Palestine च्या शांततापूर्ण विभाजनाचा प्रयत्न. याचा परिणाम म्हणजे Palestinian Nat. Authority द्वारे पहिल्यांदा palestine सरकार स्थापन झाले. पण या प्रदेशात आधीच्या इस्त्राईल वसाहती अस्तित्वात असल्याने प्रशासकीय सोयीसाठी पॅलेस्टिन प्रदेशाचे 3 भाग केले- Area A= palestine नियंत्रण, Area B= दोन्ही सरकारांचे नियंत्रण, Area C= israel नियंत्रण. या विभाजनामुळे प्रत्यक्षात पॅलेस्टीनला 100 हून अधिक तुकड्यांमध्ये आपला देश मिळाला.

     हे कट्टर ज्यूविरोधी लोकांना मान्य होण्यासारखे नव्हते. आणि याच्याच परिणामाखातर जहालवादी हमास संघटना स्थापन झाली. लष्करीदृष्ट्या ताकदवर, विध्वंसक अशी Israel ला विरोध करण्याच्या मूळ हेतूने अस्तित्वात आलेली हमास. UK, UN, US यांनी ही दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर केले आहे. 2006 ला हमास ने PLO पक्षाला (फतेह) हरवले. पॅलेस्टीनमध्ये सरकार स्थापने केले. 

     2007 Battle of Gaza (फतेह वि. हमास) हे अंतर्गत युद्ध झाले. या युद्धाने Palestine चे 2 तुकडे झाले. ◆एक israel च्या पूर्वेला तुकड्यांच्या स्वरूपातील PLO नियंत्रणाखालील West banK तर, ◆israel च्या पश्चिमेला हमासच्या ताब्यातील Gaza. त्यावर आता Palestine चा भाग असून देखील palestin चे नियंत्रण नाही.

     जेरुसलेमच्या पश्चिमेला Israel तर पूर्वेला Palestine आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जेरुसलेम पॅलेस्टीनचे आहे. पण israel चा यावर दावा आहे आणि तेथील प्रदेशावर Israel ने कब्जा केल्याचे आरोप केले जातात.
       पूर्व जेरुसलेमधून पॅलॅस्टिनन लोकांची बळजबरी हकालपट्टी केल्याच्या विरुद्ध 7 May 2021 रोजी पॅलिस्टिन लोक आंदोलन करत होते. मात्र जेरुसलेमच्या अल अक्सा मस्जिदीमध्ये जमलेल्या पॅलिस्टिनी लोकांवर इस्त्रायली पोलीसांनी बळाचा वापर केला. आणि हे आंदोलन चिघळले.
        तसे पाहत हमास व पॅलिस्टीन यांचे काही लागेबांध नाहीत. मात्र हमासने, पॅलिस्टिन लोकांचे स्वघोषित प्रतिनिधी म्हणून इस्त्रायली पोलिसांनी केलेल्या कृतीविरुद्ध इस्त्राइलला क्षेपणास्त्र हल्ला करू अशी धमकी दिली. आणि तशी क्षेपणास्त्र  डागली देखील. इस्त्राइलकडे असलेल्या 'Iron Dom' मुळे तुलनेने तेथील जीवितहानी कमी आहे. मात्र इस्त्राईलने केलेल्या प्रतिहल्ल्यात जगाला हेलावून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली. पॅलिस्टिन लोकांचे नाहक बळी गेले. यात लहान मुलांचाही समावेश आहे. आणि ही पहिली वेळ नाही. या प्रदेशात अशा हिंसक घटना घडतच आहेत.
      हिंसक प्रश्नांना हिंसात्मक मार्गाने सामोरे जाऊन प्रश्न सुटत तर नाहीच. याउलट परिस्थिती अधिक हृदयद्रावक होते. 11 दिवसांच्या मृत्यू थैमानानंतर Israel- हमास मध्ये युद्धबंदी (cease fire) ची घोषणा झाली आहे. मात्र हा दिर्घकाळ उपाय आहे का ? नसेल तर यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधण्याची व तो अंमलात आणण्याची हीच वेळ आहे.
      लोकांच्या संरक्षणासाठी, हक्कांच्या सुरक्षिततेसाठी राज्य, देशाची निर्मिती केली गेली आहे, पण आज मूळ मुद्दा बाजूला राहीला, आणि हे देश सीमा व प्रदेशांसाठी लढत आहेत. जगात माणूस आणि माणुसकीच शिल्लक नाही राहिले तर काय करणार आहोत अशा साम्राज्यांचं...??

२२ मे, २०२१

'जरा'च विसावू 'त्या' वळणावर...!!!

            'माणूस हा समाजशील प्राणी आहे' याचा प्रत्यय पदोपदी येत असतो. आपल्या सभोवती खूप सारी माणसं भावना व्यक्त करत, आनंद दुःख झेलत जगत असतात. त्यात कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपणही सहभागी असतो. एवढ्या सगळ्या माणसांत असूनही एकटेपणा जाणवतो. सगळं व्यवस्थितच चालू असतं, पण मन खूप त्रासदायक... माणसाला स्वस्थ राहू देत नाही. कधी विनाकारण अस्वस्थ होईल, कधी आनंदाने ओसंडून जाईल याचा वेध लागला तरच नवल नाही का...!

            एकटेपणात अस वाटत आयुष्य एखाद्या नवीन, अनोळखी अशा वळणावर येऊन ठेपलं आहे. म्हणून कदाचित, त्या वळणापर्यंत सोबत करणारी पूर्वीची आपली माणसं आणि वळण पार केल्यानंतर पुढे असणारी माणसं दिसत नसतील..., त्यालाच आपलं भाबड मन एकटेपणा समजत असेल...!!!

            नियतीने पुढे काय मांडलंय हे 'ते' वळण पार केल्याशिवाय नाही कळणार ना! त्यामुळे अशा वळणाला अंत न समजता केवळ 1 विसाव्याची जागा म्हणून तिथून पुढे जाता आलं पाहिजे. वळण्यासाठी प्रोत्साहन देणारी आणि वाळल्यानंतर स्वागत करणारी खूप माणसं वळणाच्या मागे पुढे उभी असतील.., मात्र वळण आपल्याला आणि आपल्याच हिम्मतीने, आत्मविश्वासाने पार करावं लागतं. त्यामुळे न थांबता "जरा'च विसावू त्या वळणावर'....!!!!



२० मे, २०२१

So called एकता, बंधुता, समता


         माणसाच्या जिवन जगण्याच्या ना खूप वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. कुणी इतरांसाठी जगतो, कुणी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. काही जण अगदी निखळ, निस्वार्थी भावनेने, आत्मिक समाधानाने समाजाच्या दृष्टीने आयडियल असे जीवन जगत असतात. पुण्यातील "Z bridge" नावाच्या 'पुलाखाली' मात्र काही लोक असे आहेत, जे मृत्यू माणसाच्या हातात नाही... आणि जन्म तर त्याहून नाही. आणि पदरी पडलेल्या दुर्दैवी जगण्याला दुसरा नाही म्हणून कुढत कुढत जीवन जगतात.
         बघा ना नियतीची करणी..., त्याच bridge "वर" आपल्या प्रेमाची फक्त चैन पूर्ण करण्यासाठी पैसे उधळणारे प्रेमी युगुल आहे, तर "खाली" या पैशासाठी आपल्या माईचा प्रेमळ पदर सोडून त्याच पैशासाठी दिवसरात्र वणवण आहे. किती हा विरोधाभास ना !
         या लोकांना पाहिलं की, प्रश्न पडतो यांना जीवनाचा अर्थ माहिती आहे का? आपण स्वप्नांशिवाय जीवन जगू शकत नाही. पण इथे स्वप्न म्हणजे काय तेच माहित नाही. आपल्याकडे बाळ बोलायला लागल्यावर त्याला आई, वडिल, आजी आजोबा बोलायला शिकवले जाते. मात्र इथे 10 वर्षांच्या मुलाला त्याच्या जन्मदात्याच नाव ही माहिती नाही !
        एक फार गमतीची गोष्ट जाणवली, त्यांची नावं राम, लक्ष्मण, हनुमान, सरस्वती, सीता अशी आहेत. जणू (गरीब) देवांची पंढरीच ती...! पण त्यांना कोण सांगणार ना, की, या जगात देवाच्या केवळ नावाने देववैभव प्राप्त होत नाही... पोटाची खळगी भरण्यासाठी जेव्हा 3-4 दिवसांच बाळ टाकून आईला कामावर जावे लागते, तेव्हा विश्वास दृढ व्हायला लागतो की 'देव' वगैरे सगळ अंधश्रद्धा आहे.
        11-12 वर्षाच्या मुलींना काय कळणार लग्न....? कसला करणार त्या संसार....? पण इथे अस्संच होतं. नाचण्या-बागडण्याच, भातुकली खेळण्याचं तींच वय... बाहुलीचं लग्न लावता लावता ती स्वतः च बाहुली होऊन जाते. आणि... बाहुलीचा चुल आणि मुलांचा संसार कधी तिचा होऊन जातो तिलाही कळत नाही... यांना प्रश्न विचारला तुम्हाला शिक्षण घ्यावसं नाही वाटत का? ते म्हणतात शिकताना काय पैसा मिळतो काय! हे उत्तर म्हणजे मला तर, कोणत्या ही सुशिक्षित भारतीयाला अक्षरश: शालजोडे मारल्यासारखे वाटते!
        यांना एवढचं माहिती आहे की आपल्याला भूक लागते, भूक लागल्यावर दोन घासांसाठी सुद्धा पैसाच लागतो!!! मात्र तो  मिळवण्यासाठी माध्यम निवडण्याचा पर्याय यांच्याकडे नाही. मिळेल ते काम करून 10-20 रूपयांसाठी झगडणे हेच त्यांचं आयुष्य. इथल्या भाबड्या लहानग्यांना आपल्याला 2000 रुपयांची नोट फक्त पाहायला मिळू शकते या नुसत्या कल्पनेनेच बावरायला होतं. आपण ज्या संस्कृतीच्या उपासक, विकसनशील, शिस्तप्रिय देशाचं गुणगाण गात जगभर मिरवतो ना... तो स्वतःचा देश "भारत"/ "India" देखील यांना माहित नाही, यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय...!
       जर भारत सुधारला म्हणजे प्रगतशील झाला असं वाटल ना, तर अर्धा तास Z bridge खाली येऊन बसायचं, वास्तवाची जाण होईल.
        खरचं, भारतातील दारिद्रय, उपासमार, कुपोषण, बालविवाह या एक ना अनेक समस्यांचं हुबेहूब चित्र इथं रेखाटलं आहे. Z bridge "वरून" बऱ्याचदा गेले असाल, एकदा खाली चक्कर टाका म्हणजे so called विकसनशील भारताचं खरं रूप पाहून डोळयांत क्षणभर का होईना पाणी तरळेल, अर्थातच संवेदनशील असाल तर!
        असो, हा झाला पुण्यातील डेक्कन शेजारचा 1 Z bridge. असे भारतात किती Z bridge आणि किती अशी लोक आहेत कोण जाणे?
        त्यांना दिवाळीचा फराळ, फटाके, चॉकलेट्स, ब्लॅकेट्स, कपडे देवून..., सहानुभूती देवून...दुबळा भारत बनवण्यापेक्षा, प्रत्येकाने एकाला एक तरी स्वप्न, इच्छा, आशेचा किरण दिला पाहिजे. तर कुठेतरी भारताची बंधुता, एकता, समता ही 'फक्त सांविधानिक' तत्त्वे अस्तित्त्वात यायला लागतील !!!

१८ मे, २०२१

मी आणि शाळा

           शाळेची भिती कधी वाटत नव्हतीच, शाळा म्हणजे दुसरं घरचं जणू! उत्सूकतेला मात्र मर्यादा उरली नव्हती कारण, मी आता मोठ्या वर्गात जाणार होते. नविन गणवेश, दप्तर, पुस्तक याचा तर आनंद होताच. तरीही शाळेच्या पहिल्या दिवशी मन धडधडतच होतं...! तस पहायला गेलं, तर आम्ही सर्व 4 थी चे विदयार्थी एकाच शाळेत, एकाच वर्गात होतो पण, मन भोळं घाबरतच होतं. आत्तापर्यंत दिवसभर एकच शिक्षक शिकवायचे. मात्र, इथे दर अर्ध्या तासाला घंटा वाजली की शिक्षक बदलायचे, याच तर नवलच निराळं!

            मला मराठीचा तास जरा जास्तच आवडायचा. कदाचित, जन्मतःच माझी मराठीशी नाळ जोडली गेली असेल! आम्हाला 5 वी मध्ये 'मला आवडते केली वाट वळणाची' ही कविता शिकवली होती आणि दुसऱ्या दिवशी ती सहाभिनय वर्गात सादर करायची होती. मला वाटतं, तो दिवस सगळ्या classmates ना चांगला आठवत असेल.

          अजून एक सारखी आठवणारी गोष्ट म्हणजे,- शाळेत परवानगी नसताना सर्वांनी वर्गात रंगपंचमी साजरी करून वर्गाचा चेहरामोहराच बदलला होता. त्यानंतर सरांनी चांगलाच चोप दिला होता ती गोष्ट सोडा..., आणखी एक वर्गातली गमतीशीर गोष्ट म्हणजे, गव्हाबरोबर खडे रगडले जात. विशेषत: खेळाच्या तासाला, चुक जरी काहीजणांची असली तरी प्रसाद सगळ्यांनाच मिळायचा. पण, हळूहळू जशा इयत्ता वाढू लागल्या, तसे मुली शांत, हुशार, अभ्यासू आणि मुलं मात्र आगावू, भांडखोर, चेष्टेखोर असं काहिसं झालं

           का कोण जाणे पण आमच्यात मुला मुलींच कधी जमलच नाही. अक्षरशः ३६ चा आकडा ! हा मात्र याला एक गोष्ट अपवादात्मक- शाळेचे क्रिडा सप्ताहाचे दिवस!!! आनंदोत्सवच म्हणा ना. मला चांगलच आठवत की, मुली कधी खो-खो च्या पुढे गेल्या नाहित आणि पोरांनी एक खेळ खेळायचा सोडले नाही!     

 मुला-मुलींनी मिळून केलेली खो-खो ची Practice, फेब-मार्च मधील सकाळची शाळा, रक्षाबंधन, ground वरचा वर्ग, जागा पकडण्याची धडपड या गोष्टी आठवल्या की उगाच मोठे झालो, असं वाटतं. मात्र यावेळी, मला.. "बदल हा निसर्गाचा नियमच आहे" हे एका सरांनी माझ्या माथी मारलेले वाक्य आठवले. असो, या आठवणी एवढ्यावर थांबणार नाही. 

         माझ्यासाठी शाळा ही नेहमीच आनंद, उत्साह, जिद्द, स्पर्धा, आस्थेचे प्रेरणास्थानचं! 

           वयक्तिक आयुष्यासाठी शाळेने मला खूप काही दिलं. अगदीच माझ्यातली मी ओळखायला शाळा आणि अर्थातच वंदनीय शिक्षक यांचा वाटा आहे हयात वावगं काही नाही. थोडक्यात, स्वतःची आवड, छंद, कला ओळखायला आयुष्य निधुन जातात, तिथं माझ्या शाळेने जगाच्या स्पर्धेत उतरण्या आधीच माझ्यातला शस्त्रांना धार लावून लढण्यास सज्ज केलं!

         कितीही नाकारला, तरी शाळा, शाळे तील मित्र-मैत्रिणी यांच्याप्रती जी आपुलकी आहे, ती कॉलेजमध्ये कितीही मोठं Friend circle असलं, तरी ते दिवस आणि आपुलकी विरळाचं!

नाही का... !!!

इस्राईल- Palestine

      हिटलरने ज्यू धर्मीयांचा कसा छळ केला, घृणास्पद वागणूक दिली  हे आपण जाणतो. मात्र ज्यूंविषयी हे अत्याचार वर्षानुवर्षांपासून  चालत आलेत. म...

Most viewed